उत्तर कोरियाला तेलपुरवठा करणारे जहाज दक्षिण कोरियाने पकडले

बुसान (दक्षिण कोरिया) – संयुक्‍त राष्ट्राने निर्बंध घातलेल्या उत्तर कोरियाला बेकायदेशीरपणे तेलपुरवठा करण्यास जाणारे एक जहाज दक्षिण कोरियाने बुसान बंदराजवळ पकडले आहे. या जहाजावर पनामाचा ध्वज आहे. या जहाजाबाबत दक्षिण कोरियाच्या तटरक्षक, सागरी वाहतुक आणि मत्स्योद्योग मंत्रालयाला संशय आला होता. उत्तर कोरियाला तेलपुरवठा करण्यासाठी गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून डिसेंबरपर्यंत एका जहाजांमधून दुसऱ्या जहाजांमध्ये तेलाचा साठा हस्तांतरित करण्यात येत आला असल्याचे दक्षिण कोरियतील वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र या जहाजाच्या रशियन मालकाने बेकायदेशीर तेलवाहतुकीचा आरोप फेटाळून लावला आहे.

हे जहाज फेब्रुवारी महिन्यात बुसान बंदरामध्ये देखभालीच्या कामासाठी थांबले तेंव्हा दक्षिण कोरियाची गुप्तहेर संघटना आणि कस्टम विभागाने जहाजाची दोनवेळा तपासणी केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला जहाजाचे प्रस्थान रोखण्यात आले. जहाजाच्या मालकाने तपासकामात सहकार्य करण्याची तयारी दाखवली मात्र दक्षिण कोरियात येण्यास टाळाटाळ केली आहे.

संयुक्‍त राष्ट्राच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून दक्षिण कोरियाने अशाप्रकारची 8 जहाजे आतापर्यंत पकडली आहेत. यातील 6 जहाजांविरोधातील आरोपांमध्ये तथ्य आढळले आहे. तर दोन जहाजांबाबत तपास सुरु आहे.
निःशस्त्रीकरणाच्या मुद्दयावरून उत्तर कोरियावर संयुक्‍त राष्ट्राने निर्बंध घातले आहेत. अमेरिकेबरोबरच्या शिखर परिषदेनंतर उत्तर कोरियाने निःशस्त्रीकरणाला तत्वतः मंजूरी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.