South Korea : दक्षिण कोरियात अध्यक्षीय निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

सेऊल : दक्षिण कोरियात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणकीसाठी मुख्य विरोधी पक्षाने आपला उमेदवार घोषित केला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीने पक्षाचे माजी नेते ली जी-म्युंग यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. उमेदवारीसाठी पक्षात घेण्यात आलेल्या प्राथमिक मतदानामध्ये ली यांना जवळपास ९० टक्के मते मिळाली आहेत. त्यांनी पक्षातील दोन इच्छुकांचा पराभव करून उमेदवारी मिळवली आहे.
स्वभावाने उदारमतवादी असलेल्या ली यांना दक्षिण कोरियामध्ये वायापक आर्थिक समानता आणायची आहे. तसेच उत्तर कोरियाबरोबर देखील सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. ली यांनी यापुर्वी २०२२ मध्ये देखील अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यून सुक येओल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आताच्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
अलिकडेच महाभियोगाद्वारे हटवण्यात आलेले माजी अध्यक्ष यून सुक येओल यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी ली यांनी पक्षातील आपली जागा अधिक भक्कम केली होती. न सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू केल्यानंतर त्यांच्याविरोधात संसदेत महाभियोगाचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी ली यांनीच लिशेष पुढाकार घेतला होता. संसदेतल्या ठरावानंतर यून यांना पदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर घटनापीठाकडून त्यावर शिक्कामोर्तब देखील करण्यात आले आहे. यून यांना अध्यक्षपदावरून हटवले गेल्यामुळे आता ३ जून रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.





