Newasa News : आत्महत्येच्या सावटातून मुलांना वाचवण्यासाठी सौंदाळा सरसावले; गावात उभारणार मानसिक सुरक्षेचे कवच!
सौंदाळा, भेंडा बुद्रुक, शहापूर, रांजणगाव आणि नागापूर परिसरात १३ ते १८ या अल्लड वयोगटातील तब्बल नऊ शालेय विद्यार्थ्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवल्याची (Newasa News) धक्कादायक मालिका समोर आल्याने अवघा परिसर सुन्न झाला आहे.

Newasa News : सौंदाळा, भेंडा बुद्रुक, शहापूर, रांजणगाव आणि नागापूर परिसरात १३ ते १८ या अल्लड वयोगटातील तब्बल नऊ शालेय विद्यार्थ्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवल्याची (Newasa News) धक्कादायक मालिका समोर आल्याने अवघा परिसर सुन्न झाला आहे. खेळण्या-बागडण्याच्या आणि स्वप्ने रंगवण्याच्या वयात ही कोवळी मुले टोकाचा निर्णय का घेत आहेत, या प्रश्नाने केवळ कुटुंबेच नव्हे तर संपूर्ण समाज हादरून गेला आहे.
ज्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आई-वडील अहोरात्र घाम गाळतात, आर्थिक विवंचनेशी झुंज देत शिक्षणाची स्वप्ने पाहतात, तीच मुले मध्येच साथ सोडून निघून गेल्यानंतर त्या कुटुंबांची होणारी वाताहात असह्य वेदना देणारी आहे.
एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर केवळ अश्रू ढाळण्यापेक्षा आणि हळहळ व्यक्त करण्यापेक्षा या संकटाच्या मुळाशी जाऊन मुलांचे प्राण वाचवण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत लोकनियुक्त (Newasa News) सरपंच शरदराव आरगडे यांनी तातडीने कठोर आणि दूरगामी उपाययोजनांचा ठराव मांडला. केवळ एका दिवसाचे समुपदेशन न करता, गावात मानसिक आरोग्यासाठी एक भक्कम सुरक्षा कवच तयार करण्याचा निर्धार ग्रामसभेने केला.
या निर्णयानुसार गावातील दहा व्यक्तींची निवड करून त्यांना तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून ते विद्यार्थ्यांशी मित्र बनून त्यांच्या मनातील तणाव, नैराश्य, कौटुंबिक कलह, प्रेमसंबंध अथवा करिअरची भीती जाणून घेऊन त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढतील. यासोबतच मुलांमधील संवाद वाढवण्यासाठी गावात ‘वाचन कट्टे’ सुरू करण्यात येणार असून तिथे मनोधैर्य उंचावणारी पुस्तके उपलब्ध केली जातील.
विद्यार्थ्यांचा मोबाईलचा अतिवापर रोखण्यासाठी पालकांचे प्रबोधन, प्रत्येक शाळेत विश्वासू शिक्षक मेंटॉरची नियुक्ती, मार्कांसाठी मुलांची इतरांशी तुलना न करण्याचे आवाहन आणि विद्यार्थ्यांसाठी एक गोपनीय हेल्पलाइन सुरू करण्याचा क्रांतिकारी आराखडा तयार करण्यात आला आहे. आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने तज्ज्ञांकडे पाठवून वेळीच उपचार मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
ग्रामपंचायतीच्या या संवेदनशील आणि धडक भूमिकेचे संपूर्ण परिसरातून स्वागत होत आहे. या महत्त्वाच्या ग्रामसभेला मुख्याध्यापक पोपट घुले, अनिल टेकणे, ग्राममहसूल अधिकारी शशिकला शिरसाठ, गणेश आरगडे, सचिन आरगडे, भारत आरगडे, बंडू आरगडे, रघुनाथ आरगडे, लक्ष्मण चामुटे, मिनीनाथ आरगडे, राजेंद्र चामुटे, बाळासाहेब आरगडे, उत्तम आरगडे, कल्याण आरगडे यांच्यासह ग्रामस्थ (Newasa News) मोठ्या संख्येने उपस्थित होते.






