मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा लवकरच बंदोबस्त : राहुल द्विवेदी

स्वच्छ सर्वेक्षण हे लक्ष्य
स्वच्छ सर्वेक्षणात नगर महापालिकेचा क्रमांक आता शंभरच्या आत आला आहे. त्यामुळे दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील तपासणीत महापालिकेला चांगले गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या स्वच्छ सर्वेक्षण हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तपासणी पथकाकडून थेट लोकांशी संवाद करून पाहणी करण्यात येते. त्यामुळे या पाहणीत शहर स्वच्छ दिसण्यावर काम करण्यात येत असून आरोग्य सैनिक त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
नगर – नगर शहरात मोकाट कुत्र्यांसह जनावरांमुळे नगरकर हैराण झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजिकरण करणारी संस्था नियुक्त करण्यात आली आहे. तसेच या संस्थेने अद्ययावत असे निर्बीजिकरण केंद्र उभारले आहे. तसेच जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात आणण्यासाठी महापालिकेने प्रशिक्षित कर्मचारी नाही.
पण आता जनावरे पकडणारी संस्था देखील मिळाली असल्याने लवकरच मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा बंदोबस्त होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिली. अद्ययावत असे निर्बीजिकरण केंद्र व कोंडवाड नसल्याने मोकाट कुत्रे व जनावरे कोठे नेणार असा प्रश्न होता. पण मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजिकरणासाठी पिंपळगाव माळवी या ठिकाणी केंद्र उभारले आहे.





