पुणे – सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांसाठी खूप काम केले आहे. लॉकडाऊन नंतरही तो प्रवासी मजुरांसाठी खूप काम करतो आहे. त्यामुळे त्याला मजूरांचा मसिहा असे संबोधले जायला लागले आहे. पडद्यावर आतापर्यंत व्हिलनच्या रोलमध्ये दिसणारा सोनू सूद मजूरांसाठी हिरो म्हणून उदयाला आला आहे. त्याची ही प्रतिमा त्याला कायम ठेवायची आहे.
म्हणूनच त्याने आपल्या फिल्मी करिअरसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पडद्यावर व्हिलनचा रोल करायचा नाही, असे त्याने ठरवले आहे. एरवी कलाकार रोलमध्ये ‘सोशल कमिटमेंट’ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.
मात्र सोनूने उलटे केले आहे. तेलगू फिल्म ‘अल्लूदू अधूर’मध्येही तो व्हिलनचा रोल करतो आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला अनुसरून निर्मात्यांनी सिनेमात त्याच्या रोलमध्ये बदल केला आहे. अनेक सीन नव्याने लिहीले गेले आणि त्यांचे शूटिंग देखील नव्याने होणार आहे.
आता सकारात्मक रोलच करायचे असे सोनूने ठरवले असल्याने यापुढच्या काळात त्याच्या सिनेमांची निवडही त्याच निकषांच्या आधारे होणार आहे. आता वर्षातून किमान दोन सिनेमेच करायचे असे त्याने ठरवले आहे.