नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली. भारतीय नागरिक बनण्याच्या ३ वर्षे आधीच सोनियांचे नाव मतदार यादीत समाविष्ट झाले. संबंधित अनियमिततेबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. विकास त्रिपाठी नामक नागरिकाने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांच्याकडे याचिका सादर केली. सोनियांना ३० एप्रिल १९८३ यादिवशी भारतीय नागरिकत्व मिळाले. मात्र, वर्ष १९८० मध्येच त्यांचे नाव नवी दिल्ली मतदारसंघातील मतदार म्हणून यादीत समाविष्ट झाले. त्यांचे नाव मतदार यादीतून १९८२ मध्ये वगळण्यात आले. त्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर सोनियांच्या नावाचा १९८३ मध्ये मतदार यादीत पुन्हा समावेश झाला, असा दावा याचिकेतून करण्यात आला. तसेच, सोनियांच्या नावाचा १९८० मध्ये मतदार यादीत समावेश झाला त्यावेळी निवडणूक आयोगाला कुठली कागदपत्रे देण्यात आली, अशी विचारणाही करण्यात आली. संबंधित प्रकरणात काहीतरी फसवणूक झाल्याचे दिसते. त्यामुळे चौकशी केली जावी. पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला जावा, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली. त्या याचिकेचा विचार संबंधित न्यायालय १० सप्टेंबरला करणार आहे.