नवी दिल्ली : कॉंग्रेसशासित कर्नाटकमधील कथित सत्तासंघर्षाच्या नाट्यावर सध्या तरी पडदा पडल्याचे चित्र आहे. मात्र, त्या राज्यातील नेतृत्वाचा पेच पूर्णपणे संपुष्टात आला नसल्याचे मानले जाते. त्यामुळे कर्नाटकचा राजकीय गुंता सोडवण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठी सरसावल्याचे सूचित होत आहे.कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १०, जनपथ निवासस्थानी शनिवारी एक महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी, के.सी.वेणुगोपाल आदी नेते सहभागी झाले. त्या बैठकीत प्रामुख्याने कर्नाटकविषयी चर्चा झाली. मात्र, ती अनिर्णित राहिली. त्यामुळे चर्चेची आणखी एक फेरी होणार असल्याची माहिती पुढे आली. बैठकीनंतर पत्रकारांनी वेणुगोपाल यांना गाठले. मात्र, त्यांनी चर्चेचा तपशील उघड केला नाही. सध्याच्या राजकीय स्थितीवर आम्ही चर्चा केली. कर्नाटकविषयीही चर्चा झाली. त्यातून ठोस काही पुढे आले नाही. आमची पुन्हा चर्चा होईल. कॉंग्रेस आणि पक्षाची कर्नाटक शाखा एकजूट आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यात नेतृत्वावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र मागील काही दिवस होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली. राजकीय संभ्रम, दुरावा संपवण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना एकमेकांची भेट घेण्याची सूचना केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या निवासस्थानी जाऊन एकजुटीची ग्वाही दिली. त्यामुळे तुर्तास सत्तासंघर्ष संपुष्टात आल्याचे चित्र समोर आले. मात्र, तो सत्तासंघर्ष कधीही उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते. ती विचारात घेऊन कॉंग्रेस श्रेष्ठी काळजीपूर्वक पाऊले उचलत आहेत. त्यातून दिल्लीतील बैठकीचे महत्व वाढले आहे.