– अरुण गोखले आपल्या कालच्याच प्रवचनाचा आधार घेत पू. बाबा महाराज म्हणाले की, “बाबा हो! काल मी जे म्हणालो ना ते एवढ्यासाठीच की देव पाहायला तीर्थयात्रा करीत किंवा वारी करीत गेलेल्या त्याच लोकांना देव भेटतो, ज्यांना त्याच्या घरातला देव कळला आहे, दिसला आहे, समजला आहे. तो देव आपल्या सर्वांच्या घरात आहे. ती त्या पंढरीत जशी विठ्ठल रखुमाई आहे ना? तशीच आपल्याही घरात विठ्ठल रखुमाई आहे. आपली माता आणि पिता हेच खरं म्हणजे आपली दैवत आहेत. जन्माला येणाच्या प्रत्येक मनुष्याचे आद्यदैवत म्हणजे त्याचे आई-वडील. तुम्ही संसारी असा किंवा पारमार्थिक, तुम्ही ईश्वरनिष्ठ असा किंवा असू नका. पण आधी हे विसरू नका की तुम्ही कोणाचे तरी मुलगा किंवा मुलगी आहात. आपल्याला जो बहु भाग्याने मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, तो त्यांच्यामुळेच. मानवी जीवनाची खरी सार्थकता साधून, त्या परमात्म्याला ओळखून त्याच्याशी एकरूप होण्याचं देह हे एक साधन आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने तर माता आणि पिता यांना मातृदेवो भव! पितृदेवो भव म्हणून गैरविले आहे. त्यांना पुजनीय ठरविलेले आहे. मातृपितृ भक्तीच्या बळावरच त्या पुंडलिकाने ते सावळे परब्रह्म हे तिथे चंद्रभागेच्या काठावर कटीवर कर ठेवून विटेवर उभे केले आहे. तो पुंडलिक, मातापित्याची सेवा करणारा श्रावण बाळ हे आपले आदर्श व्हायला हवेत. आपल्याला जन्म देण्यापासून ते घडविण्यापर्यंत आणि पुढे आपला संसार उभारून देणाऱ्या या देवांना आपण विसरून कसं चालेल? त्याची सेवा, त्यांची विचारपूस, त्यांना काय हवं नको हे आपणच आज विचारायला आणि ते आपलेपणाने द्यायला नको का? त्यांच्या म्हातारपणी आपणच त्यांचा आधार झालो, त्यांची काळजी घेतली तर ते आपल्याला लाख मोलाचा शुभाशीर्वाद देतील. त्यांच्या आशीर्वादाच बळ आपलं कल्याण करेल. दुसरी गोष्ट अशी की उद्या आपणही त्याच अवस्थेत जाणार आहोतच. म्हणून म्हणतो की, मायबापहो आधी तुम्ही तुमच्या घरच्या दैवतांची पूजा करा, त्यांचं दर्शन घ्या. देवाला देवळात न शोधता, दगडाच्या मूर्तीत न पाहता घराचं देऊळ करा आणि त्या चालत्या बोलत्या माय-बापाच्या चरणावर नतमस्तक व्हा.