लेह : पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानशी लागेबांधे असू शकतात, असा लडाख पोलिसांचा संशय बळावला आहे. त्याबाबीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. कठोर स्वरूपाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातील (रासुका) तरतुदींतर्गत ती कारवाई करण्यात आली. लडाख प्रशासनाने त्या कारवाईचे समर्थन केले. वांगचुक यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांच्या परिणामातून हिंसाचार घडल्याचे प्रशासनाने म्हटले. त्यानंतर लडाखचे पोलीस प्रमुख एस.डी.सिंह जामवाल यांनी वांगचुक यांचा उल्लेख हिंसाचारामागील महत्वाची व्यक्ती अशा शब्दांत केला. वांगचुक यांनी याआधी पाकिस्तान, बांगलादेश आदी देशांना भेटी दिल्या. त्या भेटी संशयास्पद स्वरूपाच्या आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका हस्तकाला मागील महिन्यात अटक करण्यात आली. त्या हस्तकाने वांगचुक यांच्या आंदोलनाचे व्हिडीओ पाकिस्तानला पाठवले होते, असे जामवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने लडाखमधील प्रतिनिधींना ६ ऑक्टोबरला चर्चेचे निमंत्रण दिले. मात्र, त्या चर्चेत अडथळे आणण्याचे प्रयत्न वांगचुक यांनी केले, असा गंभीर आरोपही जामवाल यांनी केला. लेहमधील हिंसाचारामागे परकी कारस्थान असू शकते, अशी भूमिका लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी मांडली. त्या भूमिकेचे एकप्रकारे जामवाल यांनी समर्थन केले. हिंसाचारावेळी जखमी झालेल्या नेपाळच्या ३ नागरिकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याशिवाय, इतर काही जण सामील असल्याची माहिती पुढे येत आहे, असे त्यांनी नमूद केले. हिंसक बनलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचेही जामवाल यांनी जोरदार समर्थन केले. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाेलिसांना गोळीबार करणे भाग पडले. स्वरक्षणसाठी ती कृती करण्यात आली. पोलिसांनी वेळीच कृती केली नसती तर संपूर्ण लेह धोक्यात आले असते. सुरक्षा दलांनी त्वरेने स्थिती नियंत्रणात आणण्याची प्रशंसनीय कामगिरी केली, असे ते म्हणाले.