वांगचुक यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर केंद्र सरकारने कारवाई केली. परकी देणग्या मिळवण्यासाठीचा त्या संस्थेचा परवाना रद्द करण्यात आला. स्टुडंटस् एज्युकेशनल ॲंड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या वांगचुक यांच्या संस्थेला परदेशांतूनही देणग्या उपलब्ध होतात. त्यासाठी संस्थेकडे परकी देणग्या नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) परवाना होता. मात्र, आर्थिक अनियमिततांच्या कारणांवरून तो परवाना रद्द करण्याचे पाऊल केंद्रीय गृह मंत्रालयाने उचलले. संस्थेच्या खात्यांमध्ये विविध प्रकारच्या विसंगती आढळल्या. स्वीडनहून प्राप्त झालेल्या निधीच्या व्यवहारात त्रुटी आढळली. संबंधित विसंगती राष्ट्रहिताविरोधात असल्याचे समोर आल्याने परवाना तातडीने रद्द करण्यात आल्याचे समजते. वांगचुक यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज् लडाख ही संस्थाही स्थापन केली आहे. ती संस्थाही एफसीआरएच्या उल्लंघनावरून सीबीआयच्या रडारवर आहे. दरम्यान, लेहमध्ये मोठ्या संख्येने पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तिथे सध्या संचारबंदी लागू आहे. हिंसाचाराबद्दल आतापर्यंत सुमारे ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.