Sonakshi Sinha: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘सिस्टम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनाक्षीने सिनेमा आणि त्याच्या उद्देशाबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं. चित्रपट हे केवळ समाज सुधारण्यासाठी बनत नाहीत, तर लोकांचं मनोरंजन करण्यासाठीही तयार केले जातात, असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. एका मुलाखतीत बोलताना सोनाक्षी म्हणाली की, प्रत्येक चित्रपटाने समाजाला योग्य दिशा दाखवलीच पाहिजे, या मताशी ती पूर्णपणे सहमत नाही. तिच्या मते, चित्रपट हे मुख्यतः मनोरंजनाचं माध्यम आहे. योग्य आणि अयोग्य याचं शिक्षण घरातून आणि शाळेतून मिळायला हवं. ते कलाकार किंवा चित्रपट निर्मात्यांचं काम नाही, असं तिने स्पष्ट सांगितलं. सोनाक्षीने उदाहरण देत सांगितलं की, एखाद्या दिवशी आपण वकिलावर आधारित कथा दाखवतो, तर दुसऱ्या दिवशी एखाद्या गुन्हेगाराची किंवा सिरीयल किलरची कथा मांडू शकतो. मात्र, त्यामुळे लोक प्रत्यक्ष आयुष्यात तसं वागायला लागतील, असं नाही. प्रेक्षकांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो, असा विश्वास तिने व्यक्त केला. तिने पुढे सांगितलं की, नैतिक मूल्यं आणि तत्त्वं ही घरात शिकवली जातात. चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी फक्त कथा मांडण्याची असते. त्यामुळे प्रत्येक चित्रपटाने समाज सुधारण्याची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा करणं योग्य नाही. चित्रपटांमध्ये वयोगटानुसार रेटिंग्स दिल्या जातात. त्यामुळे प्रेक्षकांनीही आपल्या समजुतीनुसार चित्रपट पाहायला हवेत, असंही सोनाक्षी म्हणाली. Sonakshi Sinha सोनाक्षीच्या मते, अनेकदा एखाद्या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण होतो. काही जण “हे दाखवायला नको होतं” किंवा “ही गोष्ट चुकीची आहे” असं म्हणतात. पण शेवटी चित्रपट ही एक कथा असते. ती वास्तव जीवनातून प्रेरित असू शकते किंवा एखाद्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंबही असू शकते. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहणं महत्त्वाचं आहे, असं ती म्हणाली. दरम्यान, सोनाक्षी सिन्हाचा ‘सिस्टम’ हा चित्रपट २२ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री ज्योतिका देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर यांनी केलं आहे. तर निर्मितीची जबाबदारी पम्मी बावेजा, हरमन बावेजा आणि स्मिता बालिगा यांनी सांभाळली आहे. सोनाक्षी म्हणाली की, जर एखादा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र प्रत्येक चित्रपटाने समाज बदलण्याचं ओझं उचलावं, अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. तिच्या या स्पष्ट आणि बेधडक मतामुळे सध्या मनोरंजन विश्वात नवी चर्चा रंगली आहे.