Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

कार्ला : आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर टाकवे खुर्द येथील पंकज बाळासाहेब पिंपरे (वय २२) याने चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) बनण्याचा मान मिळवला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या मे २०२५च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पंकजने सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण करून मावळ तालुक्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.
पंकजचे वडील बाळासाहेब पिंपरे रिक्षा चालक असून, त्याचे शिक्षण टाकवे जिल्हा परिषद शाळेत तर पुढील शिक्षण लोणावळ्यात झाले. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात अडकलेल्या कुटुंबाने दागिने गहाण ठेवून पंकजची परीक्षा फी भरली होती. फक्त दोन महिन्यांच्या अभ्यासात पंकजने सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सीए इंटरचे दोन्ही गट पहिल्याच प्रयत्नात पास केले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत पहिल्यांदा अपयश आल्यानंतरही त्याने हार मानली नाही,जिद्द सोडली नाही पुढचा प्रवास काट्यांचा आहे हे जाणून पंकज न डगमगता, पुरंदरचा तह हे शिवकालीन उदाहरण डोळ्यांत ठेवून आजीच्या निधनाच्या दुःखातून सावरत अवघ्या दीड-दोन महिन्यांत १५ ते १७ तासांच्या अभ्यासात त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि यश मिळवले.
पंकजच्या या यशामुळे टाकवे आणि कार्ला परिसरातील युवकांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. त्याच्या यशाचे श्रेय त्याने वडील बाळासाहेब पिंपरे, आई सुजाता पिंपरे, मार्गदर्शक सीए गुरुदेव गरुड व सीए स्नेहल गरुड यांना दिले आहे. पुढे गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा पंकजने व्यक्त केली आहे. सध्या मावळ तालुक्यात आणि टाकवे गावात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





