मंचर – करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार माजवला होता. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरीही धोका अजून टळलेला नाही. या महासाथीने अनेकांचे नातलग हिरावले. एकाच कुटुंबातील दोघा-तिघांचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथेही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. करोनामुळे बाप-लेकाचा काही तासाच्या फरकाने मृत्यू झाला आहे. घरातील दोन्हीही कर्ते पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
नारायण गंगाराम थोरात (वय-65) आणि रवींद्र नारायण थोरात (वय-38) अशी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बापलेकाची नावे आहेत. मुलगा रवींद्र थोरात यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना भोसरीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच रवींद्र यांच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांनाही पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, उपचार सुरु असताना 4 जून रोजी अचानक रवींद्र यांची ऑक्सिजन पातळी अचानक खालावली. त्यामुळे काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा शोकही संपला नव्हता तोपर्यंत कोरोना विषाणूने काही तासातच वडील नारायण थोरात यांचाही मृत्यू झाला. करोनाने घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने थोरात कुटुंबीय पोरके झाले आहे.
मृत नारायण गंगाराम थोरात हे चांडोली बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक होते. तर मृत मुलगा रवींद्र थोरात चांडोली येथील छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत होते. बाप-लेकाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.