फसवणूक प्रकरण | सोमजी दांम्पत्याला 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला न्यायालयाने आठ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावरुन दोघांना अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीलंकेतून कॅनडाला पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता
अल्नेश अकील सोमजी आणी डिंपल अल्नेश सोमजी (दोघेही रा. कोरेगाव पार्क) असे या जोडप्याचे नाव आहे. या प्रकरणी योगेश विष्णू दीक्षित (41 , रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. सोमजी दाम्पत्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम. जी. एंटरप्रायझेस या त्यांच्या एका फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर 24 टक्के वार्षिक परतावा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
फिर्यादीनी त्यांच्याकडे 66 लाख 90 हजार रुपये गुंतवले होते. त्यापैकी काही रक्कम त्यांनी परत केली. फिर्यादीसह सोमजीने किरण शेट्टी, माया द्वारकादास चावला यांचीही मिळून एकूण 3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केला. आरोपींच्या वतीने अॅड. रोहन नहार यांनी बाजू मांडली.





