Worli Vidhan Sabha Election | वरळी विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना निवडणुकीची रिंगणात उतरले होते. त्यानुसार आता वरळी विधानसभा निवडणुकाचा निकालही काही वेळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वरळीतून यंदा तिहेरी लढत पाहायला मिळत आहेत. यात आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी निवडणूक लढवली. त्यानुसार आता आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात कधी आघाडी तर कधी पिछाडीचा खेळ पहायला मिळत आहे. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतल्यानंतर ते पिछाडीवर पाहायला मिळाले होते. आता वरळी मतदारसंघाच्या 9 व्या फेरीनंतर आदित्य ठाकरे १ हजार ७१५ मतांनी आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे ( शिवसेना – उद्धव ठाकरे ) – ३२ हजार ९३८ मतं मिलिंद देवरा ( शिवसेना – एकनाथ शिंदे ) – ३१ हजार २२३ मतं संदीप देशपांडे ( मनसे ) – १२ हजार ४६३ दरम्यान, ऑक्टोबर २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे एकत्र युतीत होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरेश माने यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर मनसे अध्यक्ष आणि त्यांचे काका राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८९ हजार २४८ मतं मिळवत आदित्य ठाकरे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदानापैकी ७२.७ टक्के मतं मिळाली होती. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.