Amey Khopkar : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, परिणामी बॅाक्स अॅाफिसवर मोठी कमाई चित्रपटाने केली आहे. त्यामुळे हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी चांगले असणार अशी आशा निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आणि ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ हे दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी ३० जानेवारीला प्रदर्शित होत आहेत. एकाच दिवशी हे दोन चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत ‘फक्त महाराजांचा चित्रपट आहे म्हणून मी गप्प बसलोय. दिवसाला तीन-चार चित्रपट येतात आणि आपण मराठी निर्माते गप्प बसतो. काही निर्माते खरंच शेफरले आहेत. त्यांची मस्ती उतरवायला हवी. त्यांना बॅन करण्याची गरज आहे, असे म्हणत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेमका वाद कशामुळे? ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी असून, निर्माते अमेय खोपकर आहेत. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून, अशाच एका प्रमोशनच्या कार्यक्रमात अमेय खोपकर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून दिग्पाल लांजेकर यांना कडक शब्दांत सुनावले आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची तारीख इतर चित्रपटांसाठी तीन वेळा बदलली आहे. दुसऱ्या सिनेमाला तारीख मिळू दे चित्रपटगृह मिळतील तो सिनेमा चालेल. त्याही सिनेमाला दोन चार आठवडे मिळू दे म्हणून मी असा निर्णय घेतला होता, असे अमेय खोपकर म्हणाले. …पण मी गप्प बसणार नाही आता तीन-चार दिवसांपूर्वी दिपाल लांजकरांचा ऐतिहासिक सिनेमा जो 16 फेब्रुवारीला येणार होता, त्याचं तसं पोस्टर लॉन्च झालं होतं. आता अचानक त्यांनी 30 जानेवारीची घोषणा केली. कुणाला विचारलं नाही, सांगितलं नाही, थेट घोषणा केली, असा आरोप खोपकरांनी केला आहे. या गोष्टीचा निषेध अमेय खोपकर यांनी नोंदिवला असून, इतर निर्माते गप्प बसतात पण मी गप्प बसणार नाही. या गोष्टीचा मी निषेध करतो, अशा शब्दांत दिग्पाल लांजेकर यांना त्यांनी सुनावले आहे. असाच आगाऊपणा केला तर… सोशल मीडियावर अमेय खोपकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ते बोलताना दिसत आहेत. अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकरांना फोन केला होता. माझ्या चित्रपटाची आधी जी जाहीर केली तीच तारीख आहे. हे सांगितल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याविषयी काय निर्णय आहे तो घेऊन तुम्हाला कळवला जाईल असं सांगण्यात आलं. मात्र अजूनपर्यंत दिग्पालने कॉल केलेला नाही. उचललाही नाही. असे अमेय खोपकर म्हणाले आहेत. दिग्पाल लांजेकरने असाच आगाऊपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला दिग्पाल लांजेकरला बॅन करा असं सांगेन, असा थेट इशाराच अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता अमेय खोपकर यांनी केलेल्या दाव्यावर दिग्पाल लांजेकर यांचे काय म्हणणे आहे हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : मलायका अरोराने वयाने १७ वर्ष लहान असलेल्या मिस्ट्री मॅनबाबत केला खुलासा