Somali Pirates : 44 सोमाली चाचेखोरांना जन्मठेपेची शिक्षा; न्यायालयाकडून भारतीय नौदलाच्या शौर्याचे कौतुक
मुंबईतील एका विशेष न्यायालयाने सोमवारी चाचेगिरी आणि इतर गुन्ह्यांसाठी ४४ सोमाली नागरिकांना (Somali Pirates) दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Somali Pirates : मुंबईतील एका विशेष न्यायालयाने सोमवारी चाचेगिरी आणि इतर गुन्ह्यांसाठी ४४ सोमाली नागरिकांना (Somali Pirates) दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सर्व प्रकारची जोखीम पत्करून, कायदेशीर व आंतरराष्ट्रीय कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडल्याबद्दल न्यायालयाने भारतीय नौदलाच्या शौर्याचेही कौतुक केले. जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावताना, विशेष न्यायाधीश एस. बी. दिघे यांनी नमूद केले की आरोपींनी केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते.
सर्व ४४ आरोपींनी, ज्यामध्ये एका खटल्यातील ३५ आणि दुसऱ्या खटल्यातील (Somali Pirates) नऊ जणांचा समावेश होता. त्यांनी न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला होता आणि शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली होती. आरोपींची हलाखीची परिस्थिती आणि त्यांनी स्वेच्छेने गुन्हा कबूल केला आहे, याची आपल्याला जाणीव असल्याचे न्यायालयाने म्हटले.
परंतु दुसरीकडे, समुद्रात जहाज हायजॅक करून चाचेगिरी करणे, खंडणीसाठी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवणे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, त्यांना मानवी ढाल म्हणून वापरणे आणि भारतीय नौदलाच्या कायदेशीर सूचनांचे पालन न करणे या अत्यंत गंभीर गोष्टी आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्या हलक्यात घेता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.
आरोपींना भारतीय दंड संहिता, शस्त्र कायदा, पासपोर्ट कायदा, परदेशी नागरिक कायदा, सागरी चाचेगिरी विरोधी कायदा आणि स्फोटक पदार्थ कायदा यांन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. ज्या खटल्यात नऊ जण आरोपी होते, त्याबाबत सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, गल्फ ऑफ एडेन येथे चाचेगिरी विरोधी मोहिमेसाठी भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस त्रिशूल आणि आयएनएस सुमेधा तैनात करण्यात आली होती.
मार्च २०२४ मध्ये, इराणचा ध्वज असलेल्या एफव्ही अल कंबर या जहाजाकडून हायजॅकिंगचा (जहाज ताब्यात घेतल्याचा) इशारा (Somali Pirates) मिळाला होता. त्यानंतर आयएनएस त्रिशूल आणि आयएनएस सुमेधा यांनी तत्परतेने प्रतिसाद देत नऊ सोमाली नागरिकांना अटक केली.






