बारामती : थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन रस्त्याच्या कामामुळे फुटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर समस्यांची दखल घेऊन सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट दिली.फुटलेल्या पाइपलाइन ठिकाणी मुख्य रस्त्यावर भरउन्हात उभे राहून समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे, ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या. थोपटेवाडीत नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिलांनी पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन दिले होते. सर्वांना समान न्याय मिळावा, पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीर आणि बोअरवेलचे काम ग्रामपंचायतीने करावे, आदी सूचना सभापती तावरे यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना दिल्या. पाणीटंचाईचा विचार करून पंचायत समितीमार्फत देखील गावात बोअरवेल मंजूर करून दिले जाईल. जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर होऊन शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळावी याकरिता आढावा बैठक घेण्यात येईल. योजनेस निधी कमी पडत असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे, थोपटेवाडीच्या सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ अजय पिसाळ, प्रमोद पानसरे, सुधीर यादव, शशिकांत पानसरे, वैशाली धोत्रे, मोहन वाल्हेक, ज्ञानदेव लष्कर, लक्ष्मण चौगुले, जगन्नाथ पिसाळ, आनंद लष्कर, सचिन कांबळे, करण साबळे, हरीष कदम, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तक्रारींचा पाढा वाचला; दिलासाही दिला याप्रसंगी सभापती तावरे यांच्यासमोर गावकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. तक्रारदार व नागरिकांनी पाणी व सेवा सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर तावरे यांनी गावकऱ्यांना आश्वस्त केले. सभापती यांनी तातडीने भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आमचा पाणी प्रश्न सोडवा, अशी मागणी केली.