सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही आमदार नसताना लोकसभेची जागा जिंकण्याचा पराक्रम गाजवला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला थेट आव्हान देत पुन्हा एकदा बालेकिल्ला काबीज करण्याचा निर्धार शरद पवार गटाने केला आहे. यासाठी पक्षाने आपला विश्वासू आणि जुन्या काळातील हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अडचणीच्या काळात सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गादेकर हे गेल्या ३३ वर्षांपासून सोलापूरच्या राजकारणात शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. १९९२ पासून ते पवारांसोबत कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी काँग्रेस सोडून पवारांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले आणि आतापर्यंत त्यांची एकनिष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळे शरद पवारांनी शहराध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा विश्वासू नेत्याकडे सोपवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा समतोल आणि महाविकास आघाडीची बांधणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये समतोल साधणे हे मोठे आव्हान आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीची रणनीती आखावी लागणार आहे. शरद पवार यांची विचारसरणी पुढे नेण्याची जबाबदारी गादेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. १९९२ पासून पवारांसोबत; ‘फिरता दवाखाना’ची यशस्वी संकल्पना खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात आयोजित भव्य कार्यक्रमात गादेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कार्यक्रमाला राज्य आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. शहराध्यक्ष असताना गादेकर यांनी ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना सलग पाच वर्षे राबवली आणि जवळपास पाच लाख नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले. सुधीर खरटमल यांचा अजित पवार गटात प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र, शरद पवारांनी तातडीने महेश गादेकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून पक्षाला नवे बळ दिले आहे.