Solapur News : सोलापुरात टॉवेल कारखान्यास भीषण आग; 3 जणांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्यास भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर कारखाना मालकाच्या कुटुंबीयांसह आणखी पाच ते सहाजण कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
काय घडले नेमके?
अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्सटाइल नावाच्या टॉवेल कारखान्यात पहाटे पावणेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यात बागवान कुटुंबीयांशी संबंधित एका महिलेसह तीन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारखान्याच्या मालकाचे कुटुंबीयही अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हाजी उस्मान मन्सुरी यांच्या मालकीच्या सेंट्रल टेक्सटाइल कारखान्यात सुमारे २२५ कामगार काम करतात.
या कारखान्यात उत्पादित टॉवेलसह त्यासाठी लागणारे सूत, दोरी, रसायन, कागदी पुठ्ठे आदी माल कारखान्यात मोठ्या प्रमाणावर तयार होतो. कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी हे कुटुंबीयांसह कारखाना इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहतात. आगीत मालकासह मन्सुरी कुटुंबातील पाच ते सहाजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता भीषण असल्यामुळे अग्निशमन दलाला काम करण्यास अडचण येत आहे.





