माढा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पीक कर्ज मिळावे यासाठी तालुका स्तरावर स्थापन झालेल्या पीक कर्ज वाटप आढावा समितीची सभा 23 जून 2025 रोजी संपन्न झाली. सोलापूर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार सुभाष देशमुख यांनी अध्यक्षता केली. सहाय्यक निबंधक दत्तात्रय मोरे, लीड बँक मॅनेजर राम वारकडे, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि तालुक्यातील सर्व बँक शाखा अधिकारी उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख यांनी बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “प्रत्येक बँक शाखेने एक गाव दत्तक घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवण्यासाठी उद्दिष्ट पूर्ण करा. शेतकऱ्यांची अडवणूक टाळा आणि गरजेच्या वेळी तात्काळ मदत करा,” असे ते म्हणाले. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. बँकांनी विकासाचे केंद्र बनावे देशमुख यांनी बँकांना शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करण्यास सांगितले. “शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. बँक परिसरात ग्राहकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करा. बचत गटातील महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांना उद्योजक बनवा. यामुळे शेतकऱ्यांचा बँकांवरील विश्वास वाढेल,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, बँकांनी आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आणि विकासाचा केंद्रबिंदू बनण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. पर्यटन सप्ताहाचे आवाहन आमदार देशमुख यांनी 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पर्यटन सप्ताह साजरा करण्याची सूचना केली. “बँक शाखांनी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगळेपण निर्माण करावे आणि आर्थिक साक्षरतेसाठी पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.