MLC Election : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, अनेक दिग्गज इच्छुकांमध्ये आता एका युवा नेत्याचं नाव वेगाने पुढे येत आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. (MLC Election) सोलापूर विधान परिषदेसाठी माजी आमदार माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत असताना रोहन देशमुख यांच्या उमेदवारीबाबत अचानक राजकीय हालचाली वाढल्याचे दिसत आहे. (MLC Election) विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून रोहन देशमुख यांचा सोलापुरातील वाढता वावर आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी वाढलेला संपर्क चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्या भेटीत रोहन देशमुख विशेष उपस्थित होते. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही देशमुख यांच्या घरी भेट दिली होती. या तिन्ही नागपूरच्या नेत्यांच्या स्वागतासाठी रोहन देशमुख उपस्थित असल्याने, ही केवळ औपचारिकता होती की त्यामागे राजकीय रणनीती होती, याची चर्चा रंगू लागली आहे. (MLC Election) सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुण्यात काही महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. या बैठकींमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठीची रणनीती आणि वरिष्ठ नेत्यांशी संपर्काबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. (MLC Election) याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहन देशमुख यांना आज रात्री भेटीसाठी वेळ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीत विधान परिषद उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने, संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. (MLC Election) दरम्यान, रोहन देशमुख यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सावध भूमिका घेतली. “रोहन आता स्वतःचे राजकीय निर्णय घेण्याइतके सक्षम झाले आहेत. त्यांच्या निर्णयाबाबत मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले. (MLC Election)