सोलापूरला मिळाली पहिली महिला खासदार; भाजपच्या राम सातपुतेंचा दारुण पराभव

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75 हजार मतांनी विजय मिळवलाय. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय. 1951 पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या. हा इतिहास आज मोडला गेला आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशिलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पऱाभवाचा वाचपा काढला आहे.
1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचलाय.
आमदार प्रणिती शिंदेनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला. 2014, 2019 च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही. त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणला.
“हा सोलापूरकरांचा विजय आहे. जनतेने विश्वास ठेवून मोठी संधी दिली आहे. मी लोकसभेत जाऊन सोलापूरांचे प्रश्न मांडण्यासाठी आतुर आहे. सोलापूरच्या जनतेने भाजपला धडा शिकवला!”
– प्रणिती शिंदे, विजयी उमेदवार, काँग्रेस





