शिरूर – क्रीडा क्षेत्रासाठी शिरूर तालुक्यातून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल, शिरूर येथील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी सोहम अभिषेक जाधव याने शालेय कॅरम स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सोहमची ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. क्रीडा युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांनी आयोजित केलेल्या वयोगट १४ कॅरम स्पर्धेत सोहमने आपले कौशल्य सिद्ध केले. त्याने दाखविलेली शिस्तबद्धता आणि आत्मविश्वास यामुळे त्याची राज्यस्तरीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. सोहमच्या या घवघवीत यशामुळे विद्यालयाचे चेअरमन अनिल पायस सर व मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी त्याचे विशेष कौतुक केले. क्रीडा शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनीही सोहमच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. त्याला अभिषेक जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले. सोहमच्या या यशाने शाळेचे नाव उज्वल केले असून, शिरूर परिसरातील अन्य विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणास्रोत ठरला आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेतही सोहम उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केला आहे.