प्रभात वृत्तसेवा पुणे – मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा. ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे, असे मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करीत, लोकचळवळ तयार करावी, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. राज्य महिला आयोगामार्फत ‘संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा’ या कृतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह निर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांसह महिला आमदार, आयोगाचे सदस्य, सामाजिक संस्था, पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रथम परिसंवादात ‘तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजना आणि मॉडेल्स’ यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य ज्ञानेश्वर मुळे, अतुल राय, रश्मी टेलर आणि इरफान सिद्धावतम यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात ‘प्रवासा दरम्यान आणि ऑनलाइन माध्यमातून होणारी तस्करी’ या विषयावर चर्चा झाली. रेल्वे स्थानकं, महामार्ग, बस डेपो, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर तस्करी ओळखण्याचे आणि रोखण्याचे उपाय यामध्ये मांडण्यात आले.