बिघडलेल्या वातावरणास समाज जबाबदार – मोहन भागवत

नागपूर : राजकारणात कायम समाजातील भिन्नभिन्न घटकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असते. राजकारणामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला कितपत बळी पडायचे याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे.

पण, दुर्दैवाने आज देशाच्या बिघडलेल्या वातावरणासाठी समाजाच्या सक्रियतेचा अभाव जबाबदार आहे. वातावरण बिघडवणाऱ्यांची स्वत:ची ताकद शून्य असून समाजातील सज्जनशक्तीच्या कर्तृत्व, सद्गुण आणि प्रकाशाचा अभाव यासाठी कारणीभूत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

श्री नागपूर गुजराती मंडळद्वारा संचालित व्हीएमव्ही कॉमर्स, जेएमटी आर्टस ऍण्ड जेजेपी सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी सरसंघचालक बोलत होते. देशातील सद्य परिस्थितीवर सरसंघचालक म्हणाले, अंधकार कधीही अस्तित्वात नसतो. प्रकाशाचा अभाव हा अंधकार दर्शवितो.

त्याचप्रमाणे समाजात कर्तृत्वाचा अभाव आढळला की वातावरण बिघडते. आजही तशीच स्थिती दिसून येत आहे. आपल्याकडे विविधतेमध्ये एकता असे म्हटले जाते. त्याला बदलवून एकतेतील विविधता म्हणण्याची वेळ आली आहे.
आपली संस्कृती ही स्वार्थाची नसून आपुलकीची आहे. कबिराने देखील “ढाइ अक्षर प्रेम के’ म्हटलेले आहेच.

तेव्हा स्वार्थ आणि दरी निर्माण करणाऱ्या राजकारणाला जवळ करण्याऐवजी प्रेमाचा स्वीकार करायला हवा. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींची समान गरज असल्याचे सांगत आयुष्यात मिळविलेले ज्ञान, ताकद याचा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.