पिंपरी | पुनावळेतील सोसायटीधारकांची पावसामुळे तारांबळ

पिंपरी, (प्रतिनिधी) – मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचले. पुनावळे येथील सियानो सोसायटीमध्ये पाणी साचल्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली तर निसर्ग पूजा सोसायटीमध्ये झाड कोसळले. नागरिकांच्या मदतीला आलेले माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी त्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन रहिवाशांची विचारपूस केली. परिस्थितीचा आढावा घेत योग्य त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
दोन दिवस शहरासह उपनगरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल व खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर अनेक रस्ते, पुल पाण्याखाली गेले होते. विक्रमी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा वेळेत निचरा न झाल्याने परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
अनेक रहिवासी भागाला त्याचा फटका बसला. पुनावळेतील सियोनो सोसायटीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रहिवाशांना दैनंदिनीची कामे करण्यास अडचणी निर्माण झाल्या, तसेच निसर्ग पूजा सोसायटीत वाऱ्याने झाड पडले होते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मात्र, रहदारीस अडथळा निर्माण झाला होता.
याबाबत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना स्थानिक रहिवाशांनी माहिती देताच कलाटे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रहिवाशांची विचारपूस करत महापालिका प्रशासनाला तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत मदत कार्य सुरु केले.





