Pimpri : संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

पिंपरी : माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध समाजोपयोगी, आरोग्य व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक भान जपत नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
याविषयी बोलताना वाघेरे म्हणाले की, समाजाने मला दिलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या हितासाठी उपयुक्त उपक्रम राबवावेत, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आरोग्य शिबिर, रक्तदान व पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजसेवा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
२७ ऑगस्ट रोजी गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्र उभारण्यात येणार असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता हे शिबिर महत्त्वाचे ठरणार आहे.
२९ व ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लोकमान्य हॉस्पिटल, तळेगाव ओंको लाईफ, साने गुरुजी हॉस्पिटल, कै. शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालय, अजमेरा साई दीप इएनटी, स्पर्श हॉस्पिटल, रुबी अलकेअर, वाय.सी.एम. रुग्णालय पतपेढी तसेच इतर नामांकित रुग्णालयांचा सहभाग असेल.
या शिबिरातून मोफत वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रिया, कॅन्सर, हृदय, डोळे, हाडे, स्त्रीरोग यांसारख्या गंभीर आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत. वाघेरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या समाजोपयोगी उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा.





