ईदनिमित्त दत्तवाडी पोलिसांचे ‘सोशल पोलिसिंग’
पुणे – करोनामुळे तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने पर्वती टेकडी येथील एक कुटुंब हादरले आहे. हे समजताच या कुटुंबाला ईदचा आनंद द्यावा, यासाठी दत्तवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी रमजान ईदच्या पूर्वसंध्येला या कुटुंबाच्या घरी शिरखुर्मासाठी लागणारे साहित्य नेले. ते पाहून त्या वयोवृद्ध वडिलांना गहिवरून आले. त्यांनी “अरे बेगम बाहर आओ, अपने दरवाजे पर रमजान के पहिलेही फरिश्ता आया है,’ अशा शब्दांत पोलिसांचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
जगभरात करोनाने अनेक निष्पाप नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. त्यात पर्वती येथील एक युवक मुलगाही सापडला. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने या युवकाच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. ईद तोंडावर असतानाही हे घर सुनेसुने होते. ही घटना दत्तवाडी पोलिसांना समजली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी या कुटुंबाला शिरखुर्माचे साहित्य देण्याचा निर्णय घेतला.
पोलीस या घरी पोहोचले. त्यांनी हे साहित्य या कुटुंबाला दिले. त्यावर संबंधित युवकाच्या पित्याने पोलिसांना “सरजी आपने ईद का तोहफा देकर इन्सानियत की मिसाल दी है,’ असे म्हणत “शुक्रिया’ अदा केले.
यावेळी पोलिसांनी वयस्कर दाम्पत्याला धीर दिला. “आम्ही सर्व पोलीस तुमच्यासोबत आहोत. परंतु आता घरात इतर व्यक्ती, लहान मूल आहे. त्यांच्याकडे बघून तुमचे दुःख थोडं दूर ठेवा आणि ही प्रेमाची भेट स्वीकारा,’ अशी विनंती केली. या दाम्पत्याने जड अंतःकरणाने या वस्तू स्वीकारल्या आणि पोलिसांना मनोमन धन्यवाद दिले. या घटनेतून दत्तवाडी पोलिसांनी “सोशल पोलिसिंग’चे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले.
मुलाच्या निधनाने हे वृद्ध दाम्पत्य दुःखी आहे, हे समजल्यावर माझे मन हेलावून गेले. त्यांना दिलासा देण्यासाठी आणि ईद साजरी करण्यास त्यांना राजी करावे, असे वाटल्याने मी त्यांची भेट घेतली व त्यांचे दुःख थोडे हलके करण्याचा मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला.
– देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी