पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – समाजात, जगात एखादी घटना घडली, तर त्याची प्रतिक्रिया कायम सोशल मीडियावर उमटत असते. रतन टाटा यांच्या जाण्याने सोशल मीडियाही ढवळून निघाला आहे. त्यांच्यावर केलेल्या कविता, त्यांचे किस्से या सगळ्या सर्व माध्यमांतून अगदी भरभरून प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिम्स, रील्स, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा या आणि यांसारख्या अनेक माध्यमातून टाटांच्या जाण्यांवर अनेकजण व्यक्त होत आहेत.
रात्री आणि सकाळपासून अनेकांच्या व्हॉट्सॲप डीपीवर, स्टेटसवर टाटांना श्रद्धांजली वाहणारे मेसेजेस, फोटो आणि त्यांची कारकीर्द दर्शवणारे, तसेच यांचे आचार विचार, कर्तृत्त्व सांगणारे व्हिडिओ व्हायरल आहेत.
याशिवाय काही टाटाप्रेमींनी त्यांच्या जाण्यावर केलेली कविता प्रसारमाध्यमात व्हायरल केली आहे. याशिवाय त्यांचे काही ‘मोटिव्हेशनल’ किस्सेही अनेकांनी शेअर केले आहे.
किस्से खरे की खोटे, यापेक्षा ते किती प्रेरणा देऊन जाणारे आहेत, त्याला यामध्ये महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये टाटांची आपल्या कामगारांप्रती असलेली आस्था, त्यांचे हित याबाबत लिहिण्यात आले आहे.