…तर जनता समाजकारणातून हद्दपार करेल; पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई – राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना शेतकऱ्यांविषयी आत्मियता नाही, सामान्य माणसांबाबत आपुलकी नाही, त्यांना समाजकारणातून हद्दपार करण्याची ताकद जनतेत आहे, असा घणाघात केंद्र सरकारवर केला.
किसान मोर्चाने मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी निदर्शने केली. त्यांना संबोधित करतान पवार म्हणाले, तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरे जाणे अपेक्षित होते. पण त्यांच्याकडे ती सभ्यता नाही.
ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. गेले 60 दिवस थंडी वाऱ्याचा सामना करत शेतकरी आंदोलन करतआहेत. रस्त्यावरठाण मांडून आहेत. त्यांची देशाच्या पंतप्रधानांनी साधी चौकशीही केली नाही. अशा स्थितीत आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही,असा टीकेचा आसूड त्यांनी ओढला.
कृषी कायदा मंजूरीसाठी सदनात आल्यावर आम्ही हा विषय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. मात्र तरीही त्यांनी तीन कायदे आणले. आजच्या आज मंजूर केले पहिजेत, असे म्हणाले आणि ते मंजूर करून घेतले. हे कायदे मागे घेणे म्हणजे केंद्र सरकारला स्वत:चा अपमान असल्यासारखे वाटत आहे. खरे तर हा घटनेचा अपमान आहे. संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे, असेही पवार म्हणाले.
ही लढाई सोपी नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. आपण पाहत आहात असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.





