तर बीसीसीआयला फायदाच होईल – सकलेन

लाहोर – शोएब अख्तर, रमीज राजा, शाहिद आफ्रिदी यांनी केलेल्या मागणीला समर्थन करताना माजी कसोटीपटू सकलेन मुश्ताकनेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी जगावेगळी अपेक्षा व्यक्त करण्याची स्पर्धाच सुरु केली असल्याचे चित्र असून त्यात आता सकलेननेही ममं म्हटले आहे.
परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या एशेस मालिकेपेक्षाही जास्त लोकप्रिय असतात. या सामन्यांचा प्रेक्षकवर्गही प्रचंड असतो. दोन्ही देशांदरम्यान जिथे सामने होतात त्या ठिकाणी मैदाने तुडूंब भरली जातात. जर दोन्ही देशातील करोनाबाधितांना मदत व्हावी असे वाटत असेल तर या सामन्यांचे आयोजन करण्यात काहीच हरकत नाही, असेही सकलेन म्हणाला. केवळ करोनाग्रस्तांसाठीच निधी उपलब्ध होणार नाही तर त्यातून बीसीसीआयलाच प्रचंड नफा होइल, असेही तो म्हणाला.
सकलेनने जी मागणी केली त्यापूर्वी अख्तर, राजा, आफ्रिदी यांनीही अशीच मागणी केली होती. त्यावेळी सुनील गावसकर, कपिल देव, हरभजनसिंग यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी असे सामने आयोजित करुन लोकांच्या जीवाशी खेळ नको असे या खेळाडूंनी स्पष्ट करताना पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या प्रस्तावावर टीकाही केली होती. सामने आयोजित करुन नफा मिळवा अशी मागणी केलेल्या खेळाडूंना कपिल देव यांनी तर चांगलेच फटकारले होते. खरेतर त्याचवेळी हा विषय संपल्याचे मानले जात होते. मात्र, पुन्हा एकदा सकलेनने जुना राग आळवला आहे.





