..तर प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार – ऍड. गुणरत्न सदावर्ते

मुंबई – आजची शरद पवार आणि अनिल परब यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती. ज्या 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील, असा इशाराच ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
ते खरं आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केलं होतं की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणलं. शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत. यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, असा हल्लाबोलही ऍड. सदावर्ते यांनी केला.
आमचा संप नाही. अजय गुजरची संघटनाही संपाच्या संदर्भात होती. आम्ही दुखवट्यात आहोत. उच्च न्यायालयाने 5 नोव्हेंबर 2021ला न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीने या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यायचा होता आणि मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला न्यायालयात द्यायचा होता. शरद पवार हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? परबांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला हवे होते. आज शरद पवार यांनी आज पुन्हा न्यायालयाचा अवमान केला, असा आरोपही त्यांनी केला.





