…म्हणून दादानं लॉर्ड्सच्या गॅलरीत चक्क टी-शर्ट काढत सेलिब्रेशन केलं होत

नवी दिल्ली – 13 जुलै 2002. नॅटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना आणि समोर इंग्लंडसारखा बलाढ्य संघ. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड टीमला धूळ चारली. मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांच्या त्या विजयाचे चित्र आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा आज वाढदिवस त्यानिमित्त जाणून घेणार आहोत गांगुलीची एक विनिंग आठवण. आजही लॉर्ड्सवरचा तो प्रसंग आठवला कि सर्वांच्या अंगावर काटा येतो.
क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत दादाने आपला टी-शर्ट काढून ऐतिहासिक विजय साजरा केला. टी-शर्ट हवेत फिरवत गांगुलीने जागतिक क्रिकेटला संदेश दिला होता की, भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे. दादा आज 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशा स्थितीत जाणून घेणार आहोत त्या दिवशी दादाने नेमक तस का केलं होत.
शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेली मॅच आजही सर्वांच्या स्मरणात आहे. लास्ट विकेट बाकी असताना कैफ आणि झहीर खानने शेवटच्या ओव्हरमध्ये पळून रन्स काढत भारताला विजय मिळवून दिला होता. भारताच्या विजयापेक्षाही चर्चा झाली होती ती लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून दादाने केलेल्या सेलिब्रेशनची. अनेकांना वाटत असेल मॅच जिंकल्यामुळे हे सेलिब्रेशन केलं मात्र त्या मागची स्टोरी काहीशी वेगळी होती.
शर्टलेस सेलिब्रेशनचे कारण काय होते?
सौरव गांगुलीने अँड्र्यू फ्लिंटॉफला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्याचा टी-शर्ट हवेत फिरवून सेलिब्रेशन केल्याचे सांगितले जाते. खरे तर या सिरींजपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत झालेल्या सामन्यात इंग्लिश संघाने बाजी मारली होती. इंग्लंडच्या विजयानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफने आपला टी-शर्ट काढून मैदानावर धाव घेत भारतीय संघाला अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न केला होता. याचेच प्रत्युत्तर म्हणून सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर शर्ट काढून भिरकावला होता.




