‘एनएबीएल’ची मान्यता द्या : इंडियन मेडिकल असोसिएशन
पुणे – पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या पॅथॉलॉजीला रॅपिड ऍन्टिजेन तपासणी करण्यास परवानगी मिळावी, त्यासाठी असलेली “एनएबीएल’च्या मान्यतेची अट काढून टाकावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली. यामुळे करोनाची वेगाने तपासणी करून वाढता संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
राज्य शासनाने मुंबई, पुणेसह काही शहरांमध्ये करोनाची (कोविड 19) रॅपिड ऍन्टिजेन चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सद्य:स्थितीत या चाचण्या शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत होत आहेत. तर, खासगी प्रयोगशाळांनादेखील या चाचण्या घेण्याची परवानगी असून, त्यासाठी “आयसीएमआर’कडे अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या पॅथॉलॉजीने परवानगीसाठी अर्ज केले. परंतु, “आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खासगी लॅबला “एनएबीएल’ची मान्यता असेल तरच परवानगी द्यावी, असे आदेश असल्यामुळे या सर्व लॅबला परवानगी नाकारण्यात आली.
सध्या राज्यात केवळ 48 एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत. त्याही शहरी भागात. तर पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या पॅथॉलॉजी पाच हजारांवर आहेत. त्यामुळे राज्य शासनाने ही अट काढून प्रयोगशाळांना मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरासह ग्रामीण आणि दुर्गम भागात तत्काळ चाचणी करून करानोचा संसर्ग आटोक्यात आणता येईल. तब्बल पाच हजार नवीन केंद्रांमध्ये भर पडेल आणि चाचण्यांची संख्या वाढेल. त्यामुळे या प्रयोगशाळांना परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.
– डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन