…म्हणून लोक आपल्या भाषणांमध्ये हमखास शरद पवारांचे नाव घेतात – जितेंद्र आव्हाड

मुंबई – शरद पवारांमुळे जातीपातीचं राजकारण वाढलं, असं म्हटलं जात आहे. मी स्वत: सुद्धा मागासवर्गीय समाजातून आलोय. आज मला शरद पवार यांच्यासोबत काम करून 35 वर्षे झाली. राजकीय पार्श्वभूमी नसून सुद्धा मी आज या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे. छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि धनंजय मुंडे आम्ही सारे मागासवर्गीय समाजातून येतो. मंडल आयोग आणताना या समाजातल्या शोषित-वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणायचे, हाच शरद पवार यांचा विचार होता.
शरद पवार यांच्यामुळेच महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालं. त्यामुळे शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातम्यांमध्ये हेडलाईन होत नाही म्हणून लोक हमखास आपल्या भाषणांमध्ये शरद पवार यांचे नाव घेतात, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर टीका केली.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री आव्हाड यांनी कळकळीचे आवाहान केले की, महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य कोणीही करू नये. महाराष्ट्रात सध्या सगळे समाज एकत्र वावरताना, एकत्र काम करताना दिसत आहेत. दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावानंतर लोक पुन्हा कामाला लागले आहेत. एकतर लोकांच्या खिशामध्ये पैसे नाहीत. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, भाज्या, केरोसिन व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर महागले आहेत. मात्र यावर कुणीच बोलताना का दिसत नाही, असा सवालही त्यांनी केला.





