…म्हणून नेहा पेंडसेने चित्रपटाच्या घोषणेची तारीख केली Postponed

मुंबई – हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे या घोषणेची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित मित्तल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि निखिल महाजन यांनी केली असून चित्रपटाचे लेखन श्रीपाद देशपांडे आणि रोहित मित्तल यांचे आहे. सध्या जरी या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असले तरी लवकरच ते प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नेहा पेंडसे म्हणते, ” माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, त्यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे. या खास दिनी मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार होते, मात्र सध्या चित्रपटाच्या घोषणेची ही योग्य वेळ नाही असे मला वाटते. आपल्या सर्वांचे लाडके, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे. त्यामुळे या घोषणेसाठी आम्ही थोडी प्रतीक्षा करणार आहोत.”
निर्माते निखिल महाजन म्हणतात, ”नेहाच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार होतो. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे आमच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा आम्ही लांबणीवर नेली आहे. हा नवीन चित्रपट आम्ही विक्रम गोखलेंना समर्पित करणार आहोत.”





