स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा : पॉकेट चॅलेंजर्स व पॉकेट वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे  -पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत उपांत्य फेरीत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स या संघांनी अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व पांडे डिझाईन्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने एमपी स्ट्रायकर्सचा 2-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत गाठली. सामन्यात पहिल्या लढतीत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सच्या लकी वटनानीने सुरेख खेळ करत एमपी स्ट्रायकर्सच्या केतन चावलाचा 42-07, 89(66)-06, 00-56, 68-01 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.

लकी याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 66 गुणांचा ब्रेक नोंदविला. दुसऱ्या लढतीत लक्ष्मण रावतने भरत सिसोडियाला 57-00, 88-42, 47-24 असे नमवित संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने पांडे डिझाईन्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या शिवम अरोरा याला कडवी झुंज देत पांडे डिझाईन्सच्या दिग्विजय केडियनने 12-42, 50-63, 25-45 असा पराभव करून संघाला 1-0आघाडी प्राप्त करून दिली.

दुसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या संदीप गुलाटी याने पांडे डिझाईन्सच्या अनुज उप्पलचा 68-05, 69-42, 05-44, 63-23 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या शोएब खान याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्नूकर खेळाडू ब्रिजेश दमानीचा 37-34, 75-49, 16-43, 70-38, 62-00 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाचा विजय सुकर केला. अंतिम फेरीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघापुढे कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सचे आव्हान असणार आहे.

याआधीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिग्विजय केडियन, ब्रिजेश दमानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पांडे डिझाईन्स संघाने क्‍यू क्‍लब वॉरियर्सचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने खार जिमखाना संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.