स्नुकर : कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाला विजेतेपद

तेरावी पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे -पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाचा 3-0 असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत भारताचा क्र. 6 स्नूकर खेळाडू संदीप गुलाटी, शिवम अरोरा, शोएब खान यांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. सामन्यात पहिल्या लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या संदीप गुलाटीने कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सच्या लक्ष्मण रावतचा 58(41)-08, 00(97)97, 03-38, 73-17, 42-35 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

यात संदीप गुलाटीने पहिल्या फ्रेममध्ये 41 व लक्ष्मण रावतने दुसऱ्या फ्रेममध्ये 97 गुणांचा ब्रेक नोंदविला. दुसऱ्या सामन्यात वॉरियर्सच्या शिवम अरोरा याने आपला अनुभव व कौशल्य याचा सुरेख संगम साधत चॅलेंजर्सच्या फैजल खानवर 22-35, 80-12, 44-15, 56-39 असा विजय मिळवून 2-0 अशी संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या लढतीत वॉरियर्सच्या शोएब खान याने लकी वटनानीचा 07-41, 64-53, 47-00, 50-22 असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

स्पर्धेतील विजेत्या कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाला करंडक व 1 लाख 50 हजार रूपयांचे पारितोषिक, तर उपविजेत्या कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाला करंडक व 90 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. यासह उपांत्य फेरीतील संघाला 45 हजार रूपये व करंडक; उपांत्यपुर्व फेरीतील संघाला 25 हजार रूपये व करंडक देण्यात आले. स्पर्धेत हायेस्ट ब्रेक नोंदविणाऱ्या एमपी स्ट्रायकर्सच्या अनुराग गिरी(115 गुणांचा ब्रेक) याला नागी क्‍यू व 10 हजार रुपये, तर सिक्‍स रेड स्नूकर स्पर्धेत 77 गुणांचा विक्रम नोंदविणाऱ्या राष्ट्रीय स्नूकर खेळाडू ब्रिजेश दमाणीला नागी क्‍यू व 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एटीसी ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक निखिल कुलकर्णी, एटीसी ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडच्या पुणे विभागाच्या विक्री विभागाचे व्यवस्थापक निखिल दांडेकर आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्‍लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, आंतरराष्ट्रीय महिला स्नूकरपटू आश्‍विनी पुराणिक, क्‍लबच्या बिलियर्डस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, स्पर्धेचे संचालक सलील देशपांडे, अरुण बर्वे आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल

अंतिम फेरी:- कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स 3-0(संदीप गुलाटी वि.वि.लक्ष्मण रावत 58(41)-08, 00(97)97, 03-38, 73-17, 42-35; शिवम अरोरा वि.वि.फैजल खान 22-35, 80-12, 44-15, 56-39; शोएब खान वि.वि.लकी वटनानी 07-41, 64-53, 47-00, 50-22).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.