Smart Toilet : महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्मार्ट टॉयलेट उभारण्याची घोषणा झाल्यानंतर ती आपल्या प्रभागात उभारावीत यासाठी नगरसेवक सरसावले आहेत. प्रभागातील खराब स्वच्छतागृहे पाडून नवीन स्मार्ट टॉयलेट बांधण्याचे आठ ते दहा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीत आले आहेत. विशेष बाब म्हणजे नगरसेवकांसोबतच पालिकेच्या घनकचरा विभागानेही स्वच्छतागृहे पाडण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे प्रशासकीय काळात स्वच्छतागृहांची दुरवस्था अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच नगरसेवकांना आपल्या प्रभागात स्मार्ट टॉयलेट उभारण्याची घाई झाल्याचे दिसते. नगरसेवकांनी परिसरातील स्वच्छतागृहांच्या स्थितीबाबत समितीकडे लेखी निवेदने दिली आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, पाण्याची अपुरी व्यवस्था आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यात नमूद केले आहे. संबंधित ठिकाणे वर्दळीची व सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याने तेथे स्मार्ट शौचालये उभारण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील महात्मा फुले पेठ येथील श्रमदान मारुती मंडळाजवळील सार्वजनिक मुतारी अस्वच्छता व गैरवापरामुळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. पुणे महापालिका याबाबत पूर्वीही तक्रारी केल्या होत्या. २०२२ मध्ये कारवाईचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मुतारी तातडीने बंद करून परिसरातील स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच एल.एम.डी. गार्डन चौकातील विद्यमान शौचालयाचे नूतनीकरण करून ते स्मार्ट शौचालयात रूपांतरित करावे, अशी मागणी केली आहे. अशाच स्वरूपाचे शहरातील विविध भागांतील आठ ते दहा प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी आणि प्रभाग क्रमांक २६ मधील मुतारी अद्ययावत करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. फुले पेठेतील मुतारी कायमस्वरूपी बंद करण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच प्रभाग क्रमांक २८, जनता वसाहत, गल्ली क्रमांक ८, जयभवानी नगर येथील सार्वजनिक शौचालय मोडकळीस आल्याची तक्रार नमूद केली आहे.