SMART Scheme – स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप (स्मार्ट) योजनेत दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवला जाणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे. सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेचा पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेत बारामती परिमंडळात अद्यापपर्यंत १ हजार १३ ग्राहकांचे अर्ज प्राप्त आहेत. त्यात बारामती मंडळात १९५, सातारा मंडळात ३४९ तर सोलापूर मंडळात ४६९ अर्ज प्राप्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने ‘स्मार्ट’ योजना सुरू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे, हा या योजनेचा हेतू आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यात ग्राहकांना छतावरील एक किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. ‘स्मार्ट’ योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसवता येईल. महावितरण. ‘स्मार्ट’ योजनेत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल. शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे. ग्राहकांचा मोठा फायदा दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपये, शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना ५ हजार रुपये हिस्सा भरायचा आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळणार असल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांनी महावितरणच्या वेबसाईटवर अर्ज करावा किंवा महावितरणच्या संबंधित शाखा/उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. अत्यल्प खर्चात छतावर सौर ऊर्जा संच बसवून 25 वर्षे मोफत वीज मिळवण्याच्या या संधीचा पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.