एक जानेवारीपासून होणार अंमलबजावणी : आगारात स्वतंत्र कक्ष
पिंपरी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसह, दिव्यांग, कर्णबधिर व अंध विविध योजनेअंतर्गत सवलत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या योजनेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आता प्रवाशांना एक जानेवारीपासून सवलतीच्या दरामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. त्यामुळे, आपले स्मार्टकार्ड काढण्यासाठी सध्या वल्लभनगर आगारामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच दिव्यांग बांधवही गर्दी करीत आहे. 1 जानेवारीनंतर स्मार्टकार्ड नसणाऱ्या प्रवाशांना भाड्यामध्ये सवलत मिळणार नसून पूर्ण तिकिटाने प्रवास करावा लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे स्मार्टकार्ड नाही, अशा प्रवाशांना नवीन वर्षापासून सवलत नाकारली जाणार आहे. महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रवास दर सवलतीसाठी स्मार्टकार्ड अनिवार्य आहे.
वेगवेगळ्या समस्या
सहा महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारात आणि खासगी एजन्सीमार्फत स्मार्टकार्ड केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रावर सध्या दररोज स्मार्ट कार्डचे काम सुरु आहे. मात्र, या यंत्रणेमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. स्मार्टकार्ड काढताना कधी नेटवर्कमध्ये बिघाड तर कधी कनेक्टिव्हिटीचा अभाव अशा समस्या उद्भवत आहेत.
वाढू लागली गर्दी
दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांबरोबरच बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्मार्टकार्ड काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे, सध्या स्मार्टकार्ड काढून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून दररोज या प्रवशांना स्मार्टकार्डचे वाटप करण्यात येत आहे. एक जानेवारी जशी-जशी जवळ येत आहे, तशी-तशी संबधित केंद्रावर स्मार्टकार्ड काढण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे सध्या ज्येष्ठ नागरिकांची अचूक नोंद नाही. पुणे विभाग तसेच वल्लभनगर आगारात नेमके किती ज्येष्ठ नागरिक आहेत याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही. यापूर्वी केवळ आधारकार्ड दाखवून केलेल्या प्रवासात 50 टक्के सवलत दिली जात होती. आता मात्र, स्मार्टकार्ड काढल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची नोंद घेता येणार आहे. तसेच दिव्यांग, अंध, कर्णबधिर, विद्यार्थी यासांठी असलेल्या वेगवेगळ्या योजनेतून प्रवास करणाऱ्यांची नेमकी आकडेवारीही स्मार्टकार्डने समोर येणार आहे.
स्मार्टकार्डवर प्रवास करताना येणार मर्यादा
एसटीमधून प्रवास करण्यासाठी 100 टक्के सवलत असणाऱ्या प्रवशांना आता आठ हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादा आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवसामध्ये 50 टक्के सवलत आहे. त्यांना 4 हजार किलोमीटरपर्यंत प्रवासाची मर्यादा आहे. ज्या प्रवाशांची किलोमीटरपर्यंत प्रवासाची मर्यादा संपली आहे, अशांना पूर्ण तिकीट देऊन प्रवास करावा लागणार आहे. स्मार्टकार्डमुळे प्रवाशांनी किती किलोमीटर प्रवास केला याचा डाटा अपडेट होणार आहे.