Smart Bus Shed – पिंपळे सौदागर येथील शिवाजी महाराज चौकात नव्याने उभारलेल्या स्मार्ट बस शेडमुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी अडचणी वाढल्या आहेत. मनपा शाळेसमोरील बसथांब्यावर शेड उभारण्यात आले आहे. मात्र येथे बैठक व्यवस्था करण्यात आलेली नाही. बसची वाट पाहताना प्रवाशांना तासन्तास उभे राहावे लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेत ही समस्या अधिक जाणवत आहे. शेड असूनही बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांत नाराजी आहे. याशिवाय जुने शेड मोडकळीस आलेले आहे. त्याची उंचीही कमी आहे. बसथांब्यावर फ्लेक्सचे अतिक्रमण वाढले आहे. थांब्यासमोर चारचाकी वाहनांचे पार्किंग होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्मार्ट बस शेड उभारण्यामागचा उद्देश प्रवाशांना संरक्षण देणे हा आहे. मात्र मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी तातडीने बैठक व्यवस्था बसवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.