#SLVIND T20I Series : श्रीलंकेचा मालिका विजय

कोलंबो – भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताचा 7 विकेटस्ने पराभव करत मालिका जिंकली. भारताने दिलेले 82 धावांचे आव्हान श्रीलंकेने 14.3 षटकात 3 गडी गमावत सहज पार केले.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना सलामीवीर अविष्का फर्नांडो (12) आणि मिनोद भानुका (18) यांनी सावध सुरुवात करून दिली. यानंतर धनंजय डिसील्वाने नाबाद 23 धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब करून दिला.भारताकडून राहुल चहरने 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत कर्णधार शिखर धवनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताची सुरुवात निराशाजनक ठरली. कर्णधार शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन आणि नितीश राणा हे झटपट बाद झाले.
यानंतर भुवनेश्वर कुमारने 16 आणि कुलदीप यादवने 23 धावा केल्याने भारताला 20 षटकांत 8 बाद 81 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.





