‘एसआरए’च्या संमतीसाठी झोपडपट्टीधारकांना गुंडांकडून दमदाटी

नगरसेविका सीमा सावळे यांची आयुक्तांकडे तक्रार; कठोर कारवाई करण्याची मागणी
पिंपरी – शहरात एसआरए अंतर्गत काही झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत. कायद्यानुसार या योजनेसाठी सर्व झोपडी धारकांची संमती घेणे बंधनकारक आहे. काही राजकीय नेते, दलाल व बिल्डर हे झोपडपट्टी दादांच्या मदतीने अशा संमती पत्रासाठी झोपडीधारकांना सक्ती करतात तर काही ठिकाणी दमदाटीचे प्रकार सर्रास सुरू आहेत, असा आरोप भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, शहरातील प्रत्येक झोपडीधारकाला आहे त्या ठिकाणीच पक्के घर मिळाले पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. मात्र त्यासाठी सक्ती किंवा दमदाटी कदापि खपवून घेणार नाही. महापालिका प्रशासन, एसआरएचे अधिकारी आणि पोलिसांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करावी. जिथे कुठे संमती पत्र भरून घ्यायचे असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन व संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक करावे. त्याशिवाय अशा सर्वेक्षणासाठी पोलिसांचा बंदोबस्त पुरवावा.
शहरात 75 अधिकृत आणि 30पेक्षा अधिक अनधिकृत झोपड्या आहेत. महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी तसेच खासगी जागेवर या झोपड्या आहेत. सुमारे तीन लाख लोक कुटुंबासह तिथे राहतात. 30-40 वर्षांपासून या वसाहती आहेत. आता एसआरएद्वारे त्यांचे आहे त्या जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे.
तर, काही मंजुरी मिळावी म्हणून रांगेत आहेत. प्रकल्पांना मंजुरी घेण्यासाठी संबंधित झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची लेखी संमती ही कायद्यानेच बंधनकारक आहे. ज्या विकसकाने अटींची व अन्य कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्यांनाच या कामासाठी संधी मिळते. आता अशा प्रकारे झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम मिळावे यासाठी काही राजकीय लोक, जमीन दलाल, बिल्डर्स यांच्यात चढाओढ सुरू आहे, असे सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.
संमतीपत्र देताना कोऱ्या अर्जावर सह्या घेण्याची सक्ती होत असते. त्याशिवाय संबंधित कुटुंबाला हा अर्ज कशासाठी भरून घेतला जातो त्याची पूर्ण कल्पना दिली जात नाही. नेमका विकसक कोण आहे, त्याचा पूर्वानुभव काय, त्याची पात्रता काय आहे, संक्रमण शिबिर कुठे असणार आहे, किती मोठे घर मिळणार, मेंटेनन्स कोण व किती देणार, घराचा ताबा केव्हा पर्यंत देणार आदी कोणताही तपशील दिला जात नाही. झोपडीपट्टी दादा येऊन संमती पत्रावर सही करण्याची सक्ती करतो. झोपडीधारक पात्र की अपात्र याची खातरजमा न करता सह्या घेतल्या जातात. काही विकसक गोरगरिबांना त्रास देतात त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
आमच्याशी संपर्क साधा
संमती पत्रासाठी अशा प्रकारे कोणा झोपडीधारकाला दमदाटी, सक्ती केली गेली तर त्यांनी अगदी निर्धास्तपणे थेट पोलिसांकडे तक्रार दाखल करावी अथवा आपल्याशी संपर्क करावा, असे आवाहनही सीमा सावळे यांनी केले आहे.





