शिक्षण संचालकांच्या खुर्चीला चप्पल, बांगड्याचा हार

इंग्रजी शाळा शुल्क वाढीविरुद्ध पालकांचा संताप

पुणे – इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी बेकायदेशीरपणे वाढीव फी वसूल करण्याचा धडाका लावला आहे. यावर प्राथमिक शिक्षण संचालकांकडून शाळांवर कोणतीच कठोर कारवाई करण्यात येत नाही. सतत चालढकलपणा करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ पालकांनी आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी करत प्राथमिक शिक्षण संचालकांच्या खुर्चीला चप्पल व बांगड्याचा हार घालून संताप व्यक्त केला.

बहुसंख्य इंग्रजी शाळांकडून नियमबाह्यपणे विद्यार्थ्यांकडून वाढीव फी आकारण्यात येत आहे. शासनाने या फी वसूलीला मान्यता दिलेली नाही. अनेक इंग्रजी शाळांकडून सुरू असलेल्या फी वाढीविरुद्ध पालकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आदेश शाळांकडून धुडकावून लावण्यात आले आहेत. त्यामुळे शाळामधून वाढीव फी वसुली अजून सुरूच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वच शाळांमधील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात तळ ठोकून बेमुदत उपोषण आंदोलन केले.

विबग्योर शाळेच्या वाढीव फी व इतर प्रकरणांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण दाखल आहे. या शाळेने वाढीव फी न भरल्याने प्राजक्‍ता पेठकर यांच्या इयत्ता सातवीत शिकत असलेल्या नीलकुमार पेठकर या मुलाला शाळेतून काढून टाकले आहे. याचाही न्यायालयीन प्रकरणात समावेश आहे. या विद्यार्थ्याला सन्मानाने शाळेत पुन्हा प्रवेश देऊन त्याची परीक्षा घेण्यात यावी. त्याचे शैक्षणिक नुकसान करू नये, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली. आंदोलनात प्राजक्ता पेठकर, रुपाली महाजन, गुंजन मेहता, सुमित ऐरन, सुमीत कोळी, मिहीर देसाई, राधिका पाटणी, तन्मय पाटणी, निधी ऐरन आदींनी सहभाग घेतला.

शिक्षण विभागातील राजेंद्र गोधने, अधीक्षक श्रीधर शिंत्रे यांनी पालकांचे निवेदन स्वीकारुन त्यांच्याशी चर्चाही केली. प्रश्‍न सोडविण्याबातचे लेखी पत्रही पालकांना दिले. मात्र, तरीही पालक आंदोलनावर ठाम होते. शिक्षण विभागाकडून शासनाला वस्तुनिष्ठ अहवाल अनेक वेळा देण्यात आले आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्याबाबत शासनाला प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी पुन्हा शासनाच्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा करण्यात आली. शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र शिक्षण विभागाने पालकांना देण्यात आले.

…म्हणून चिडले पालक
आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आलेली असतानाही प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी पालकांची बाजू समजून घेण्याऐवजी कार्यालयात अनुपस्थित राहण्यालाच प्राधान्य दिले. यामुळे पालकांचा पारा आणखीच वाढला. पालकांनी शाळा प्रशासन, शासनाचा शिक्षण विभाग यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. वातावरण तापल्याने शिक्षण विभागाने तत्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. ठोस निर्णय होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत पालकांनी आंदोलन सुरूच ठेवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.