Skipping Breakfast Side Effects: अनेकजण वजन कमी करण्याच्या नादात किंवा सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता टाळतात. “नाश्ता नाही केला तरी चालेल” असे वाटत असले, तरी ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे. तो शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभरासाठी तयार करतो. रात्री ७ ते ८ तास झोप घेतल्यानंतर आपले शरीर उपवासाच्या अवस्थेत असते. सकाळचा नाश्ता हा हा उपवास तोडतो आणि शरीराचा मेटाबॉलिझम सुरू करतो. जर नाश्ता केला नाही, तर शरीराची कॅलरी जाळण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे नाश्ता टाळणाऱ्या लोकांना दिवसभर जंक फूडची जास्त इच्छा होते. त्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढतो. दुसरा मोठा परिणाम मेंदूवर होतो. आपला मेंदू ग्लुकोजवर चालतो. सकाळच्या नाश्त्यामुळे मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळते. यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते. जे लोक नाश्ता करत नाहीत, त्यांच्यात चिडचिड, थकवा आणि सुस्ती अधिक दिसून येते. काही वेळा रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होते. आनंदी ठेवणारे सेरोटोनिन आणि डोपामाइन यांसारखे हार्मोन योग्य प्रमाणात सक्रिय राहण्यासाठी सकाळचे पोषण आवश्यक आहे. सकाळचा नाश्ता रिकाम्या पोटी दीर्घकाळ राहिल्यास पचनासंबंधी तक्रारी सुरू होऊ शकतात. अॅसिडिटी, गॅस आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. काहींना मायग्रेनचा त्रासही होतो. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यास अशक्तपणा आणि चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते. इन्सुलिनचे संतुलन बिघडल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो. हृदयाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. काही अभ्यासांनुसार, नियमित नाश्ता न करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका अधिक असतो. त्यामुळे दीर्घकाळ नाश्ता टाळणे ही सवय गंभीर परिणाम घडवू शकते. मग नाश्ता कसा असावा? तज्ज्ञ सांगतात की नाश्त्यात प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वांचा समतोल असणे गरजेचे आहे. दूध, फळे, ओट्स, दलिया, पोहे, इडली, पराठा यांसोबत सुका मेवा यांचा समावेश करता येतो. शक्यतो तेलकट आणि अतिगोड पदार्थ टाळावेत. सकाळचा नाश्ता हा केवळ भूक भागवण्यासाठी नसून, तो आपल्या शरीराची बॅटरी चार्ज करणारा आहार आहे. दिवसाची सुरुवात चांगल्या आणि पौष्टिक नाश्त्याने केली, तर शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका.