पुणे -तीन ते 16 वर्षे वयाच्या सुमारे 75 चिमुकल्यांना घेऊन “राधिका क्रिएशन्स’च्या राधिका देशपांडे यांनी “सियावर रामचंद्र की जय’ हे हिंदीतील महानाट्य शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात सादर केले. हे महानाट्य स्वत: राधिका यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. “ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल’च्या सहयोगाने ते सादर करण्यात आले. राम, लक्ष्मण, सीता, रावण, शूर्पणखा, हनुमान, जांबुवंत, सुग्रीव, जटायु, मंथरा, दशरथ राजा, राण्या आणि मुख्य म्हणजे वानरसेना, खारूताई अशी एक ना अनेक पात्रांनी रामायणात आपापली भूमिका बजावली आहे. तीच पात्र महानाट्यात राधिका यांनी तीन ते 16 वयोगटातील मुलांकडून बसवून घेतली आणि एवढ्या मुलांना सांभाळात ती रंगभूमीवर लिलया साकारली. त्यांच्या सोबतच 25 सहाय्यकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. रामजन्म ते रावणवध या दरम्यान रामाच्या आयुष्यातील सगळे महत्त्वाचे प्रसंग यामध्ये सादर करण्यात आले. छोट्या वयातही राम समजून घेऊन त्याचा अभिनय करणे, सीतेची भूमिका तेवढ्याच ताकदीने सादर करणे, तिच्या भावभावना एवढ्या चिमुकल्या सीतेने अगदी हुबेहूब सादर केल्या. उभारलेल्या वानरसेनेत अनेक लहान मुलांचा सहभाग होता. त्या मुलांनीही वानरवेषात “एन्जॉय’ केला. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्याशिवाय भाव खाऊन गेला तो रावण. रावण साकारलेल्या छोट्या मुलाकडे पाहिल्यानंतर रामानंद सागर यांच्या अजरामर झालेल्या “रामायण’ मालिकेतील रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी या कलाकाराची आठवण न झाली तर नवल! सुरुवातीला राधिका यांनी लिहिलेल्या “चीपर बाय दि डझन’ आणि “बोलो तारारारा’ या बालनाट्याच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपीठावर संजय पेंडसे, “ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल’च्या मुख्याध्यापिका सुरिन्दर कौर सयान, शर्मिला कदम, स्वप्ना जोशी आणि श्यामराव जोशी उपस्थित होते. या महानाट्याला विशेष मार्गदर्शन संजय पेंडसे आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.