सहावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र ‘भीमाशंकर’

कडेकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्यांचे तुषार अंगावर झेलत, श्रावणधून ऐकत आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर येऊन पोचतो. तेथे डाकीनी नावाचा डोंगर आहे. म्हणून या परिसरातील जंगलाला डाकीण वन असे म्हणतात. पुराणात या क्षेत्राचे वर्णन “डाकिन्यंम भीमाशंकरम’ असे केले आहे. येथे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरून आंबेगाव तालुक्‍यातील मंचरपासून भीमाशंकरला जाता येते. पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी भीमा नदीचे उगमस्थान आहे. हीच नदी पंढरपूरक्षेत्री “चंद्रभागा’ या नावाने ओळखली जाते. घनदाट जंगलाने वेढलेले हे मंदिर डोंगराच्या कोंदणात आहे. तिथे तीनशे-साडेतीनशे पायऱ्या उतरून जावे लागते. हे बाराशे वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर आहे. त्याच्या छतावर व स्तंभांवर सुंदर नक्षीकाम आहे. मंदिरावर दशावताराच्या रेखीव, सुंदर मूर्ती व दगडी स्तंभावर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत.

समयांच्या स्निग्ध प्रकाशात उजळून निघालेल्या गर्भागारात रुद्राभिषेकाचा मंगल मंत्रघोष घुमत असतो. सालंकृत स्वयंभू शिवलिंगावर बिल्वपत्रे आणि जांभळी कमलपुष्पे अर्पण केल्यावर चित्त प्रसन्न होते. भीमा नदीचे मूळ उगमस्थान ज्योतीर्लिंगात आहे. पण ती तेथून गुप्त होते आणि मंदिरापासून दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते. ओढ्याच्या खाली पिंडीसदृश्‍य आकार नैसर्गिकरीत्या तयार झाला आहे. या गुप्त भीमाशंकराचे दर्शन घेऊन मन हर्षभरित होते.

– माधुरी शिवाजी विधाटे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.