नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सहा जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाली आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग यांनी सांगितले. या सहा जणांच्या बडक्याचे आणि रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सर्व जण इटलीहून परत आले होते.
तत्पुर्वी सकाळी नोएडामधील एक प्रख्यात इंग्लिश माध्यमाची शाळा कोरोना विषाणूच्या भितीने बंद ठेवण्यात आली. दिल्लीतील कोरोना बाधीत रुग्णांनी गेल्या आठवड्यात वाढदिवसाची पार्टी दिली होती. त्यात त्यांची मुले आणि त्यांचे वर्ग मित्र यांसह नोएडातील 25 जण उपस्थित होते, असे समजते.
दरम्यान ही शाळा चार ते सहा मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अन्य एक शाळा नऊ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी या शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत.